पुणे । महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या.
भुजबळ यांनी भिडेवाडा, महात्मा फुले वाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, राजेश बनकर व सहायक आयुक्त किसन दगडखैर उपस्थित होते.
राज्य शासनाने या स्मारकाच्या एकत्रीकरण व विस्तारीकरणाला मंजुरी दिली असून, या कामांसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १०० कोटी रुपये शासनाकडून पुणे महानगरपालिकेला वितरित करण्यात आले आहेत.
स्मारकाच्या लागून असलेल्या आरक्षित क्षेत्राचे प्रत्यक्ष सर्वेक्षण महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले असून, यामध्ये 119 सिटी सर्वे क्रमांक, 624 मालक, 358 भाडेकरू व 36 गाळ्यांचा समावेश आहे.
या सर्वेक्षणावर आधारित भूसंपादनाची कामे लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती चंद्रन यांनी दिली.
भुजबळ यांनी स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिलेल्या सूचना देखील विचारात घेण्याचे सांगितले. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची अमूल्य ठेव असलेल्या या स्मारकाचा विकास म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे सशक्त प्रतीक असेल, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.











