नाशिक । सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक आज विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच ४ हजार कोटी यपयांच्या मंजूर निविदांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत बैठकीत डॉ. गेडाम यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या की, त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांची बारकाईने तपासणी करून अधिक अचूक नियोजन करण्यावर भर द्यावा.कुंभमेळा हा एक मोठा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. त्यामुळे त्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी अचूक व सुसूत्र नियोजनाची आवश्यकता आहे, असे मत डॉ. गेडाम यांनी व्यक्त केले.
यावेळी ४ हजार कोटी रुपयांच्या मंजूर निविदांची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच २ हजार कोटी रुपयांच्या प्रगत अवस्थेतील निविदाही त्वरीत निर्गमित कराव्यात, असे स्पष्ट केले.
प्राधिकरणासाठी कार्यालय स्थापन होणार
प्राधिकरणासाठी स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला. उपयुक्त करिश्मा नायर यांना यासंदर्भात योग्य, मध्यवर्ती व समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठिकाण निवडण्याचे निर्देश देण्यात आले.
कुंभमेळा कक्ष होणार अधिक व्यापक
यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कुंभमेळा कक्षाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी त्याला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे. नियोजन, अंमलबजावणी, गुणवत्ता नियंत्रण आणि विभागीय समन्वय यावर अधिक लक्ष देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त करिश्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, रेल्वे, लेखा, आरोग्य आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









