मुंबई : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावरुन सुरु असलेला ठाकरे आणि शिंदे गटातील वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या.
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणाला आता दोन वर्षांचा कालावधी लोटला असून याचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. ठाकरे गटाकडून वारंवार नव्याने अर्ज सादर केले जात असल्याने न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांना याबाबत थेट सूचना दिली – “हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, आता वारंवार अर्ज करण्याची गरज नाही. ऑगस्टमध्ये याची मुख्य सुनावणी घेऊ.”
शिंदे गटातर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, तर ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल आणि रोहित शर्मा यांनी बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमध्ये मुख्य सुनावणीसाठी तारीख मागितली असता, न्यायालयाने “तारखेबाबत लवकरच कळवू” असे सांगितले.
या प्रकरणात अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या सुनावणीनंतर काही दिवसात राखून ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिका निवडणूक देखील त्याच दरम्यान होऊ शकते, त्यामुळे या निकालाचे राजकीय पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वादाच्या दीर्घकाळासाठी ताशेरे ओढत म्हटले की, “दोन वर्ष झाली, आता हा प्रश्न निकाली काढायलाच हवा.” न्यायालयाने दिलेल्या संकेतांनुसार, हा निकाल 2025 च्या अखेरपर्यंत घोषित केला जाऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येईल का, की एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, ठाकरे गटासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.










