नाशिक । उत्तर महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात असून, त्या पार्श्वभूमीवर जिंदाल स्टेनलेस स्टील समूहाने या भागात गुंतवणूक करण्याची उत्सुकता दर्शविली आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी आणि संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच जिंदाल स्टेनलेस स्टील समूहाचे मुख्य व्यवसाय अधिकारी शशीभूषण उपाध्याय आणि विक्री व मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष विशाल शेठ यांची भेट घेतली.
या चर्चेत उत्तर महाराष्ट्रातील उपलब्ध पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, औद्योगिक क्षमता तसेच आयात-निर्यातीच्या संधी याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. संजय सोनवणे यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रात मुबलक जागा, पाणी, वीज आणि समृद्धी महामार्गाद्वारे उत्कृष्ट वाहतूक सुविधा उपलब्ध असल्याने उद्योग गुंतवणुकीसाठी हा प्रदेश अत्यंत पोषक आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत उपाध्याय यांनी सांगितले की, जिंदाल समूह रायगड जिल्ह्यात ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात गुंतवणुकीची शक्यता त्यांनी मान्य केली.
या बैठकीत कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे यांनी कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगांसाठी उत्तर महाराष्ट्रातील संधी, शेतीमालाच्या निर्यातवाढीची क्षमता आणि कृषीपूरक उद्योगांच्या शक्यता याविषयी सादरीकरण केले. मुंबई विभागाचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी चेंबरच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत, या उपक्रमांमध्ये जिंदाल समूहाचे सक्रिय सहकार्य मिळावे, अशी मागणी केली.
या मागणीला जिंदाल समूहाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, समूहाचे वरिष्ठ अधिकारी लवकरच महाराष्ट्र चेंबरच्या मुख्यालयास भेट देऊन नवनियुक्त अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्यासोबत राज्यातील गुंतवणुकीबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. या शिष्टमंडळात मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरमचे चॅप्टर हेड बाळासाहेब आमरे, सदस्य आनंद सूर्यवंशी उपस्थित होते.











