नाशिक : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रामजन्मभूमीच्या ऐतिहासिक संदर्भावर सविस्तर प्रकाश टाकत म्हटले की, “रामजन्मभूमीचा इतिहास किमान एक हजार वर्षांचा असून, त्याबद्दल शंका उपस्थित करणे गैरसमजुतीला खतपाणी घालण्यासारखे आहे.
भाजप उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या राम जन्मभूमीचा प्रवास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रोहिणी बुक पॅलेस आणि नंदिनी पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक संवाद सेतू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना भांडारी यांनी सांगितले की, १९८६ मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. १९९० मध्ये त्यांनी संबंधित माहितीची पुस्तिका तयार केली होती. तब्बल ३० वर्षांच्या अभ्यासानंतर आता या विषयावर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. रामजन्मभूमीचा विषय १ हजार वर्षांपूर्वीचा असून, राम आणि अयोध्येचा संदर्भ ५ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
“रामायण खरे आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, पण अयोध्येत रामजन्मभूमीचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे, याचा ऐतिहासिक आधार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अल्बेरुनीसह अरबी, तुर्की, फ्रेंच आणि इटालियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनाचा उल्लेख करत, अयोध्येतील रामजन्मभूमीचा उल्लेख असल्याचे सांगितले.
भांडारी यांच्या म्हणण्यानुसार, बाबरने भारतात काही लढाया जिंकल्या असल्या तरी त्याने संपूर्ण भारतावर राज्य केले नव्हते. बाबरनामा या त्याच्या आत्मचरित्रात अयोध्येचा उल्लेख नाही. जर बाबरने अयोध्येत मशिद बांधली असती, तर ती नोंद त्याच्या बाबरनाम्यात असती, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, बाबरी मशीदचा उल्लेख ११९८६ नंतर पुढे आला. १९४९ मध्ये पं. नेहरूंनी देखील ‘बाबरी मशीद’ असा शब्दप्रयोग केलेला नाही. त्या काळात राममूर्तीची स्थापनाही झाली होती आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या मूर्तीच्या दैनंदिन पूजेकरिता अधिकृत आदेशही दिला होता.
ब्रिटिशांनी देखील अयोध्येतील गर्भगृहाचा भाग नमाजासाठी आणि बाह्य भाग हिंदू पूजेसाठी खुला ठेवला होता. मात्र नमाज कधीही त्या स्थळी झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
भांडारी यांनी आरोप केला की, कम्युनिस्ट इतिहासकारांनी बाबरी मशीदचा अपप्रचार केला आणि देशाच्या एकात्मतेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. स्टालिनच्या भूमिकेप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट आजही भारताचे विभाजन व्हावे अशी भूमिका घेत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शेवटी भांडारी यांनी स्पष्ट केले की, रामजन्मभूमीवर मशिद कधीच नव्हती, सरकारी कागदपत्रे आणि ऐतिहासिक नोंदीही याला पुष्टी देतात.











