संस्कृत विद्यापीठांचे संघटन होणे गरजेचे ; चांदे

नाशिक । संस्कृत शिक्षणात आधुनिकता आणणे गरजेचे असून, वेदाध्यानासोबत संगणक आणि इंग्रजी भाषेची जोड देत, संस्कृत भाषेची उपयोगिता सामान्य जनतेपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी देशभरातील संस्कृत विद्यापीठांचे संघटन होणे गरजेचे असून, त्याचे नेतृत्व कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी करावे , असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे यांनी केले.

संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित तीन दिवसीय उत्कर्ष महोत्सवाच्या निमित्ताने येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आयोजित “आगामी १० वर्षांची संस्कृत संवर्धन योजना” या विषयावरील परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केन्द्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्रा. जी.एस.आर. कृष्णमूर्ती (तिरुपती) आणि प्रा. मुरलीमनोहर पाठक (नवी दिल्ली), केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली चे शैक्षणिक डीनमदनमोहन झा, नाशिक च्या संस्कृत विद्यापीठाचे संचालक नीलाभ तिवारी उपस्थित होते.

पुढे बोलताना कुलगुरू चांदे म्हणाले की, कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा सरकारने ५ वर्षात १५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती, प्रत्यक्षात फक्त सव्वा कोटी रुपये मिळाले. इतर अनुदान देणे बंद केले. त्यामुळे सरकार वरती अवलंबून न राहता आपले स्थान तयार करून स्वतःच्या पायावर उभे राहा. मंजूर जागांच्या पाच दहा टक्के जागा भरल्या जातात, त्यामुळे अनेक ठिकाणी संस्कृत विभाग बंद होत आहेत.

संस्कृतच्या लोकांनी हट्ट सोडायला हवा. संस्कृत जाणणारेच संस्कृती रक्षक नाहीत, ही भावना सोडली तर चांगली प्रगती होईल. संस्कृत मध्येही कृत्रिम बुद्धीमता येत आहे. त्याचा वापर काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. संस्कृत टिकवायची तर संघटित होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


यावेळी देशभरातील सुमारे १८ संस्कृत विद्यापीठ आणि विविध संस्थांचे कुलगुरू आणि त्यांचे प्रतिनिधी या परिसंवादात सहभागी झाले होते. त्यांनीही यावेळी या परिसंवादात आपली मते मांडली.

यामध्ये कुलगुरू सुकांत सेनापती (गुजरात), कुलगुरू प्रल्हाद जोशी (आसाम), कुलगुरू हरेराम त्रिपाठी (रामटेक), कुलगुरू मनोहर पाठक (एल बी एस दिल्ली), कुलगुरू प्रसाद जोशी (पुणे), आचार्य रामसलाही द्विवेदी, प्रो श्रीधर मिश्र, प्रो रमाकांत पांडे, प्रो सुदेशकुमार शर्मा, आणि विविध संस्थांचे आचार्य आणि संस्थाचालक उपस्थित होते.

याप्रसंगी संस्कृत मधील प्रख्यात लेखक नित्यानंद मिश्र यांना संस्कृत सेवाव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिसंवादाच्या दुसर्‍या सत्रात विविध कुलगुरू आणि उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सूर्यप्रसाद यांनी केले.

error: Content is protected !!