नाशिक । नाशिकच्या अंबड, सातपूर, सिन्नर आणि गोंदे औद्योगिक वसाहतीतील अस्थिर वीज पुरवठ्यामुळे उद्योजक संतप्त झाले असून, महावितरणचा कारभार जर लवकर सुधारला नाही, तर उद्योजकांवर आत्मदहनाची वेळ येईल, असा इशारा बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे आणि धनंजय बेळे यांनी दिला. आयमा रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित बैठकीत उद्योजकांनी महावितरणच्या अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत, हजारो कोटींच्या नुकसानीचा जाब विचारला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे दररोज दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहत असून, त्यामुळे उद्योजकांचे आतापर्यंत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. काही दिवशी १८ तासांपर्यंत वीज गायब राहिल्याने उत्पादन थांबले, निर्यातीवर परिणाम झाला आणि यामुळे अनेक कंपन्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे निदर्शनास आले. अंबडमधील १३२ फीडरचा अत्यंत वाईट अनुभव येत आहे.या फीडरवर डबल केबल टाकण्याची विनंती अनेकदा करूनही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याचे आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी सांगितले.
उद्योजकांचा रोष
उद्योजक जयप्रकाश जोशी, राजेंद्र पानसरे, निखिल पांचाळ, हर्षद बेळे, रवींद्र झोपे यांच्यासह अनेकांनी महावितरणच्या कारभारावर कठोर टीका केली. १३२ फीडरचा दर्जा अत्यंत खराब आहे. डबल केबल टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका करत पानसरे यांनी मोठ्या नुकसानीची नोंद केली. यावर महावितरणचे अधिकारी मात्र मुग गिळून गप्प असल्याचे चित्र होते. यावेळी पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी दिले.
या बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ललित पाटील, नागरे, जगताप, भांबर, चौरे, तसेच सहायक अभियंता कुशारे व जोगळेकर उपस्थित होते. उद्योजकांत निखिल पांचाळ, रवींद्र झोपे, हर्षद बेळे, मनीष रावल, जयप्रकाश जोशी, माधुरी सोमवंशी, विश्वास कुडाळ यांच्यासह अनेक उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उद्योजकांची मागणी
प्रत्येक फीडरचे ऑडिट आणि देखभाल व्हावी.
पालापाचोळा वेळेत हटवावा, फांद्यांची छाटणी करावी.
शटडाऊनची पूर्वसूचना दिली जावी.
फोन न उचलणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी.










