मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट २०२५ रोजी केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरून एकाचवेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ करणार आहेत. यात अजनी (नागपूर) – पुणे, बेंगळूरू – बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटडा – अमृतसर या गाड्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
नागपूर हे संत्र्यांचे शहर, विदर्भाचे वैद्यकीय व शैक्षणिक केंद्र, तसेच बौद्ध तीर्थक्षेत्र दीक्षाभूमी आणि रामटेकसारख्या धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानले जाते, ज्याचे मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि दगडूशेठ गणपती, आळंदी, जेजुरी यांसारख्या धार्मिक स्थळांशी घट्ट नाते आहे.
या सेवेमुळे दोन्ही शहरांदरम्यान व्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक व नियमित प्रवाशांसाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होईल. पर्यटन, उद्योग व व्यापार क्षेत्रालाही यामुळे चालना मिळेल.
सेवेचे वेळापत्रक
- 26101 पुणे–अजनी वंदे भारत एक्सप्रेस : ११ ऑगस्टपासून आठवड्यातील ६ दिवस (मंगळवार वगळता), सकाळी ०६.२५ ला पुणेहून सुटून सायंकाळी १८.२५ ला अजनी येथे आगमन.
- 26102 अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस : १२ ऑगस्टपासून आठवड्यातील ६ दिवस (सोमवार वगळता), सकाळी ०९.५० ला अजनीहून सुटून रात्री २१.५० ला पुणे येथे आगमन.
कोच रचना : एक्झिक्युटिव्ह चेअर कार (५२ आसने) १, चेअर कार ७ – एकूण क्षमता ५३० प्रवासी.
वंदे भारतचे वैशिष्ट्ये
- पूर्ण वातानुकूलित डबे, स्वयंचलित तापमान नियंत्रण
- मोठ्या पॅनोरामिक खिडक्या
- बायो-व्हॅक्यूम आधुनिक शौचालये
- स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे
- सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन इंटरकॉम
- ३०% ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादन ब्रेक प्रणाली
- ड्युअल सस्पेन्शनमुळे अधिक आरामदायी प्रवास
सध्या देशभरात ७२ वंदे भारत गाड्या २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत धावत असून, येत्या तीन वर्षांत २०० हून अधिक वंदे भारत गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा संकल्प आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार झालेल्या या गाड्या भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि आत्मनिर्भर प्रवासाचे प्रतीक ठरत आहेत.











