नाशिक । नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ यांनी एक मोठी कारवाई करत, आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवत माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडे १ कोटींची खंडणी मागणार्या आरोपीला धरमपूर, गुजरात येथून अटक केली.
२३ एप्रिल ते १६ मे दरम्यान स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांना फोन करून, तुमच्या साहेबांच्या फार्महाऊसवर रेड पडणार आहे, भुजबळांच्या त्रंबकेश्वर फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसा साठवलेला आहे, फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड पडणार आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मी देखील प्राप्तिकर विभागाचा अधिकारी आहे. धाड टाकणाऱ्या टीम मध्ये माझा सहभाग आहे.तुम्हाला मदत हवी असल्यास मदतीसाठी १ कोटी रुपये द्यावे लागतील अशी धमकी देण्यात आली होती.
सदर क्रमांक त्यांच्याच मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी ही माहिती नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे पथक गुजरातच्या धरमपूरकडे रवाना झाले.
गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीशी साक्षीदारांच्या माध्यमातून संपर्क ठेवून ठिकाण ठरवले होते. परंतु, आरोपी वारंवार जागा बदलत होता. शेवटी परतत असताना करंजाळी येथे आरोपी राहूल दिलीप भुसारे (वय २७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने खंडणी मागितल्याचे कबूल केले आहे.
त्याच्याकडून काळ्या रंगाची होंडा शाइन दुचाकी, मोबाईल फोन, खोटी नोटा असलेली बॅग, आणि काही खरी रोकड असा ८५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम २०४, ३०८(२), ३०८(५), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोउपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांच्या पथकाने केली.











