दहावी, बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा वेळेआधी घेतल्याने, निकालदेखील यावर्षी लवकर जाहीर होणार आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून घेण्यात आली होती. सध्या उत्तरपत्रिकांची तपासणी अंतिम टप्प्यात असून, मे महिन्यात निकाल लागणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर आणि मुंबई विभागांतील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. मंडळाने वेळेवर तपासणी पूर्ण व्हावी यासाठी शिक्षकांकडून सातत्याने पाठपुरावा केला. तपासलेल्या उत्तरपत्रिका ८ एप्रिलपर्यंत मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत होती. त्या वेळेपूर्वीच बहुतांश उत्तरपत्रिका जमा झाल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

यंदा बारावीचा निकाल ९ मे तर दहावीचा निकाल १५ मेच्या आसपास लागेल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुढील शिक्षणासाठी होणारी प्रवेश प्रक्रिया सुकर होणार असून, विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश घेता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. बोर्डाने अजून निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी लवकरच ती प्रसिद्ध होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


error: Content is protected !!