मुंबई । ईद-ए-मिलाद या इस्लाम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणानिमित्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात जाहीर झालेल्या सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी ५ सप्टेंबर २०२५ रोजी ही सुट्टी जाहीर झाली होती, मात्र आता ही सुट्टी सोमवार, ८ सप्टेंबरला असेल, असे सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे.
६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक होणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुखांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने सुट्टीचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने पत्रकाव्दारे केली आहे.
कुठे लागू होणार बदल?
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा : सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर २०२५ रोजी राहील.
इतर सर्व जिल्हे : यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ५ सप्टेंबर २०२५ रोजीच सुट्टी असेल.
काय राहील सुरु?
५ सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर विभाग नेहमीप्रमाणे सुरु राहतील. ग्रामीण भाग व इतर जिल्ह्यांमध्ये मात्र या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. राज्यातील दोन महत्त्वाचे सण – अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद – शांततेत व सौहार्दाने साजरे करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.











