मुंबई । भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या लष्करी संघर्षानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 48 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची घसरण झाली असून, गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही “वेट अॅन्ड वॉच”च्या भूमिकेत गेले आहेत.
11 मे रोजी प्रति 10 ग्रॅम 96,710 रुपयांवर असलेला 24 कॅरेट सोन्याचा दर, सलग दुसर्या दिवशी 4 हजार रुपयांनी घसरून आज (12 मे) 92,910 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दरही आता 85,287 रुपये इतका झाला आहे. याआधी, मागील आठवड्यात सोन्याने 1 लाख 500 रुपयांची कमाल किंमत गाठली होती.
जगभरातील घडामोडींचा परिणाम
या दरघसरणीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अनिश्चितता. अमेरिका आणि चीनने आयात-निर्यातीवरील शुल्कामध्ये मोठी सवलत दिली असून, अमेरिकेने टॅरिफ 145% वरून 30% आणि चीनने 125% वरून 10% पर्यंत कमी केले आहेत. ही सवलत तात्पुरती – फक्त 90 दिवसांसाठी – असली, तरी याचा थेट परिणाम गुंतवणुकीच्या स्वरूपावर आणि सोन्याच्या दरावर दिसून आला आहे.
भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानसोबत तणाव शिगेला पोहोचला होता. या लष्करी चकमकीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात सोन्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे मागील आठवड्यात दर वाढले होते. मात्र आता परिस्थिती पूर्ववत होण्याच्या दिशेने जात असल्याने, दरात घसरण होत आहे.
दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण चलनविषयक निर्णयांमुळेही सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय चढउतार झाले. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेले कठोर धोरण गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकत आहे.
ग्राहकांचा ‘वेट अँड वॉच’ मूड
सोन्याच्या विक्रमी भाववाढीनंतर निर्माण झालेली साशंकता आता किंमती घसरल्यानंतर संधीच्या रूपात पाहिली जात आहे. अनेक ग्राहक पुन्हा सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र, दर अजून स्थिर न झाल्याने बाजारात एक अनिश्चितता आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत अमेरिका-चीन व्यापार चर्चेचा पुढचा टप्पा, तसेच भारत-पाकिस्तान संबंधातील स्पष्टता सोन्याच्या दराला प्रभावित करू शकते.









