काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काय आहे कारण

नाशिक । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांना नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्ग्यावरील कारवाईनंतर दलवाई घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि थेट गंगापूर पोलीस ठाण्यात आणले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना दलवाई म्हणाले, मी गांधीवादी आहे. मी तिथे फक्त पाहणीसाठी गेलो होतो, कोणतीही घोषणाबाजी केली नाही. मी गोळवलकर किंवा सावरकर वादी नाही, आणि दगडफेकीस कधीच पाठिंबा देत नाही. दलवाई यांनी स्पष्ट केले की, ती दर्गा 350 वर्षांपूर्वीची होती आणि तिचा इतिहास समजून घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. समाजात तणाव निर्माण न होता शांततेत चर्चा व्हावी ही माझी भूमिका आहे.

पोलिसांनी कोणत्याही अनुचित प्रकाराची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून दलवाई यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.

सदर प्रकरणावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून दलवाई यांच्या भूमिकेचे काही ठिकाणी समर्थन होत आहे, तर काही ठिकाणी टीकेचा सूरही ऐकायला मिळतो आहे. पुढील तपास व कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

error: Content is protected !!