नाशिक – तब्बल ३० ते ३५ वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेल्या आणि नंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी आता शिवसेना शिंदे गटातूनही बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
“मी पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही,” असे म्हणत हेमलता पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसला रामराम केला होता व शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी शिवसेनेतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा विचार त्यांनी जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










