नाशिक । शिवसेनेतून हकालपटटी केलेले सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला आता भाजपातील एका गटाकडून विरोध सुरू झाला आहे. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बडगुजर यांच्या गुन्हयांची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेत आपण नाराज असल्याची कबुली दिली. तसेच योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करू असे त्यांनी सांगितले. मात्र पक्षातून लागलीच त्यांची हकालपटटी करण्यात आली. त्यामुळे बडगुजर भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, नाशिकमध्ये भाजप संघटनात्मक बैठकीसाठी आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सांगत एक प्रकारे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला संमतीच दर्शवली. तसेच सदरचा चेंडू मंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात टोलावला.
विधानसभा निवडणूकीत भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात बडगुजर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली. दोन वेळा ते आ.हिरेंविरोधात निवडणूकीला सामोरे गेले. त्यामुळे ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराला अडचणी उभ्या केल्या त्यांना पक्षात घेवू नये तसेच बडगुजर यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याने स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी ते पक्षात येत असावेत असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आमदार हिरे यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत बडगुजर यांच्या गुन्हयांबाबत सविस्तर माहिती देत निवेदनच दिले. यात बडगुजर यांच्यावर असलेल्या २९ गुन्हयांची जंत्रीच त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षाचे कसे नुकसान होईल याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
यावेळी आमदार हिरेंसह, माजी नगरसेवक नगरसेवक अॅड.श्याम बडोदे, माधुरी बोलकर, भगवान दोंदे, सतीश सोनवणे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, अलका अहिरे, पुष्पा आव्हाड, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे आदिंसह मंडल अध्यख, पदाधिकारी उपस्थित होते.









