नाशिक – राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आता २९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. १० टक्के कोट्यातून शासकीय निवासस्थान मिळविण्याच्या प्रकरणी त्यांच्यावर जिल्हा न्यायालयाने पूर्वीच शिक्षा ठोठावली होती. मात्र, या शिक्षेला कोकाटे यांनी कायदेशीर आव्हान देत अपील दाखल केले आहे.
शुक्रवारी नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या कार्यवाहीसाठी कोकाटे स्वतः उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी प्राथमिक युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २९ ऑगस्ट निश्चित केली. दरम्यान, दोन्ही पक्षांना लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण
१० टक्के कोट्यातुन कोकाटे यांनी घर लाटत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आले आहे. शासनाच्या नियमांनुसार, या कोट्यातील निवासस्थानांच्या वाटपात केवळ पात्र व्यक्तींनाच प्राधान्य दिले जाते. मात्र, कोकाटे यांनी पात्रतेअभावीही अशा निवासस्थानाचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.
विरोधी पक्ष नेत्यांनी कोकाटेंनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली आहे, तर कोकाटे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आता २९ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते हे स्पष्ट होणार आहे.







