म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज नाही भरला ? अजूनही संधी चुकवू नका

मुंबई । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची सोडत आता १८ सप्टेंबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली


नवीन वेळापत्रकानुसार सदर सोडतीसाठी २८ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक २९ ऑगस्ट, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी ७ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ’म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक १६ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ’म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणाया अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ – ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यातआला आहे.

error: Content is protected !!