गोविंदपुरी गाव झाले टँकरमुक्त

जल जीवन मिशन योजनेची प्रभावी अमलबजावणी

नाशिक । केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नाशिक तालुक्यातील गंगा म्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गोविंदपुरी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर संपुष्टात आला आहे. मागील सात वर्षांपासून या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र जल जीवन मिशन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे दिनांक 07 एप्रिल 2025 पासून गावात नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या बदलामुळे गाव टँकरमुक्त बनले आहे.

गोविंदपुरी हे सुमारे 400 लोकसंख्येचे गाव असून, त्याची भौगोलिक रचना जमीन सपाटीपासून तब्बल 105 मीटर उंचावर आहे. त्यामुळे या भागात भौगोलिक मर्यादेमुळे पाणी पोहचवणे हे मोठे तांत्रिक आव्हान होते. यासाठी तीन फेज वीजपुरवठ्याची आवश्यकता होती, परंतु यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन पंचायत समिती नाशिकच्या गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे यांनी विशेष पुढाकार घेत डॉ. नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावरील 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून विशेष तरतूद करून 100 अश्वशक्तीचा विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) गावात बसवण्यात आला.

या महत्त्वपूर्ण यंत्रणेमुळे जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यात आली. या रोहित्राच्या साहाय्याने 15 अश्वशक्तीचा जलपंप कार्यान्वित करण्यात आला आणि शेवटी गावात नळाद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुरू होऊ शकला.

या योजनेची अंमलबजावणी केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर व्यवस्थापनदृष्ट्याही एक उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व लोकसहभागातून या उपक्रमात गती प्राप्त झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले. परिणामी, गोविंदपुरीसारख्या उंचावरील गावातही शाश्वत जलसंपदा निर्माण होऊन ‘हर घर नल से जल’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद देसले यांनी योजना पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांशी समन्वय साधला असून सरपंच भारती मनोहर खोडे,ग्रामपंचायत अधिकारी गंगाराम लहानु गायकवाड मक्तेदार अभिषेक पाटील व महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आदींनी याकामीपरिश्रमघेतले.

error: Content is protected !!