नाशिक | नाशिकजवळील माडसांगवी गावातील ३६ शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत दावा केला आहे की, त्यांची सुमारे ५० एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बेनामी पद्धतीने हडपण्यात आली आहे. याप्रकरणात त्यांनी थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जळगावचे व्यापारी सुनील झंवर आणि दिल्लीस्थित भारत स्टील ट्युब्स लिमिटेड कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन १९८२ साली बनावट कागदपत्रांच्या आधारे वळवून, भारत स्टील ट्युब्स लि. या कंपनीच्या नावावर लावण्यात आली. पुढे २०१५ मध्ये, हीच जमीन सुनील झंवर यांनी ३ कोटी ३ लाख ३ हजार ३० रुपयांना विकत घेतल्याचा व्यवहार दाखवण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष व्यवहार गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरूनच झाला असून, झंवर हे केवळ नावापुरते खरेदीदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या प्रकरणात प्रांत अधिकारी आणि तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शेखर देसाई यांच्याकडे तक्रार केली होती. देसाई यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र तरीही शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून जमीन एका खाजगी कंपनीला विकण्यात आली.
या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, “कोणीही कोणावरही आरोप करणे आज सोपे झाले आहे. जर माझ्यावर आरोप करायचा असेल, तर माझं नाव असलेली कागदपत्रं दाखवावीत. सुनील झंवर माझा मित्र असला तरी त्याने ती जमीन रीतसर घेतली आहे.” तसेच, “ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांच्यावरच किती गुन्हे आहेत हे आधी तपासा. ब्लॅकमेलिंगसाठी कोणी काय करत आहे, हे तपासणे गरजेचे आहे,” असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून, शेतकरी व त्यांच्या समर्थकांकडून या प्रकरणात सखोल चौकशी व जमीन परत मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे.










