नाशिक । घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. आता रविवार (दि.३१) रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. धन, समृध्दी आणि शक्तीचे प्रतिक मानली जाणारी देवी गौरी ही माता पार्वतीचेच एक रूप आहे. गौरींना काही ठिकाणी महालक्ष्मी देखील म्हणतात. लोकपरंपरेनुसार, गौरी ही गणपतीची आई पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. माहेरवाशीण असलेल्या गौरींचा पाहुणचार मोठ्या भक्तिभावाने केला जातो. या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकच्या बाजारपेठेत महिलांची खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते. असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर असे त्यांना म्हणतात.
गणेशाची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप गौरी आहे. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. म्हणूनच या दिवसांना ‘महालक्ष्मी पूजन’ असेही म्हणतात. यासाठी सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात.
गौरी आवाहन कसे करावे
घरात गौरीचे स्वागत करताना, ज्या स्त्रीच्या हातात गौरी असतील, तिचे पाय दूध आणि पाण्याने धुवून त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घराच्या उंबर्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत आणले जाते. काही ठिकाणी, गौरींना घरात प्रवेश देण्याआधी, त्यांना घराची समृद्धी आणि दुधदुभत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे. गौरींना साडी नेसवून, दागिने आणि मुखवटा घालून सजवले जाते. या दिवशी संध्याकाळी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.
दुसर्या दिवशी या दिवशी गौरींची पूजा आणि आरती केली जाते. यासाठी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे असे विविध पदार्थ बनवून केळीच्या पानावर नैवेद्य दाखवतात.
तिसर्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात. या गाठींमध्ये हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, रेशीम धागा अशा वस्तू टाकून त्या बांधल्या जातात. गौरींची पूजा-आरती करून, गोड शेवयाची खीर आणि उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवला जातो. गौरींचा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. विसर्जन करून परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरात सर्वत्र टाकतात, यामुळे घरात समृद्धी येते अशी लोकांची श्रद्धा आहे.
या चुका टाळाव्यात
गौरी आवाहनाच्या आधी घराची पूर्ण स्वच्छता करावी. गौरी आवाहन आणि पूजेचा मुर्हूत चुकवू नये. उत्सवाच्या तीन दिवसांत नित्यनियमाने पूजा करावी. पूजा करताना आणि नवैद्य बनवतांना पावित्रय राखावे.
गौरी आवाहन : रविवार, ३१ ऑगस्ट
गौरी पूजन : सोमवार १ सप्टेंबर
गौरी विसर्जन : मंगळवार २ सप्टेंबर
गौराई शुभ मुहूर्त
गौरी आवाहन : रविवार, ३१ ऑगस्ट : संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांपर्यंत
गौरी पूजन : सोमवार, १ सप्टेंबर : सकाळी 5 वाजून 59 मिनिटे ते सायंकाळी 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत
गौरी विसर्जन : मंगळवार, २ सप्टेंबर : रात्री 9 वाजून 50 मिनिटांपर्यंत











