नाशिक । नाशिकमध्ये गणेशोत्सवाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शहरातील विविध गणेश मंडळांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. ऑगस्ट अखेरीस गणरायाचे आगमन होत असताना, देखाव्यांच्या उभारणीसह नियोजनाची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच गणेश मंडळांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गणेश मंडळांनी रात्री १२ वाजेपर्यंत देखावे खुले ठेवण्यास परवानगी द्यावी, तसेच शेवटच्या गणेश मंडळाच्या विसर्जनापर्यंत मिरवणूक सुरू ठेवावी, असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. जर मिरवणूक रात्री १२ वाजेनंतर थांबवली गेली, तर त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंडळांच्यावतीने देण्यात आला.
या बैठकीस गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, विनायक पांडे, गजानन शेलार, रामसिंग बावरी, लक्ष्मण धोत्रे, तसेच महेश महाकाळे, सत्यम खंडाळे, पोपटराव नागपुरे, बबलू परदेशी, गणेश बर्वे, शिवा तेलंग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
परवानगी प्रक्रिया
एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार ज्या मंडळांना पाच वर्षांपूर्वी परवानगी मिळाली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, प्रत्यक्षात पुन्हा अर्ज मागवले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त झाली.
राज्य महोत्सव पण अध्यादेश नाही
गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित करण्यात आला असला तरी अद्याप अध्यादेश निघालेला नसल्याची खंत मंडळांनी व्यक्त केली.
वीज जोडणी व दराबाबत सवाल
मंडळांना वीज जोडणीसाठी जाहीर केलेली सवलत स्लॅबनुसार लागू होत नसल्यामुळे महावितरणकडून मोठा आर्थिक बोजा बसत असल्याचे सांगण्यात आले. तसेच दरवर्षी घेतली जाणारी अनामत रक्कम परत मिळत नाही, याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे यंदा वीज जोडणी न घेण्याचा इशाराच यावेळी देण्यात आला. जर अनामत रकमेचा प्रश्न न सुटल्यास, यंदा वीज जोडणी न घेता तारांवर आकडे टाकून वीज घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा दिला गेला.
विसर्जन मिरवणूक आणि वेळ:
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होईपर्यंत मिरवणूक सुरू ठेवावी, अशी मागणी केली गेली.
मुंबई-पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी द्यावी. डीजेवर बंधने नाहीत, मग नाशिकच गणेशोत्सवात मागे का?
- समीर शेटे, अध्यक्ष, गणेश महामंडळ
महावितरणकडून घेतलेली अनामत रक्कम अद्याप परत मिळालेली नाही. यंदा जर प्रश्न सुटला नाही, तर वीज जोडणी न घेता आकडे टाकून वीज घेऊ.
- गजानन शेलार, दंडे हनुमान मित्रमंडळ
पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर नाशिकमध्येही ‘नाशिक फेस्टिव्हल’ आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच परवानगी प्रक्रिया सुलभ व्हावी.
- विनायक पांडे, माजी महापौर










