गुड न्यूज : कर्मचार्‍यांना आगाऊ वेतन, टोलमाफी व रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

मुंबई । राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑगस्ट महिन्याचा पगार ठरलेल्या तारखेपेक्षा तब्बल पाच दिवस आधी म्हणजेच २६ ऑगस्टला खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीच्या खर्चाची चिंता काही प्रमाणात दूर होणार असून कर्मचार्‍यांचा आनंद दुणावला आहे.

या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही मिळणार आहे. त्यामुळे सणाच्या तयारीसाठी ‘खिसा गरम’ होणार आहे.

याशिवाय, गणेश मंडळांनाही दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सणाच्या शेवटच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे उत्सवाचा जल्लोष अधिक रंगतदार होणार आहे.

दरम्यान, कोकणात गणेशदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी टोलमाफीचीही घोषणा झाली आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा व मुंबई-बेंगळुरू महामार्गासह राज्य महामार्ग विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर गणेशभक्तांच्या वाहनांना व एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे.

त्यासाठी खास गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन नावाचे पास देण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भाविक, कर्मचारी व गणेश मंडळ तिन्ही स्तरावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!