जावळीपासून विधान परिषदपर्यंतचा प्रवास – शशिकांत शिंदे यांचा परिचय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मागील सात वर्षांपासून या पदावर कार्यरत असलेल्या पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता असून, १५ जुलै रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.

शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. जर संधी मिळाली तर ते माझं भाग्य असेल. पवारसाहेब माझं दैवत आहेत. आर.आर. पाटलांसारखं काम करण्याचा मी प्रयत्न करेन.”

शिंदे यांनी बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि तरुणांच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की, नवीन लोकांना संधी देऊन नेतृत्व उभं करणं हा शरद पवारांचा राजकीय दृष्टिकोन आहे आणि त्या वाटेवर आपणही काम करू.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले शिंदे हे माथाडी कामगार चळवळीतील प्रभावी नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९९ मध्ये प्रथमच निवडणूक लढवून जावळी मतदारसंघातून आमदारकी मिळवली. जलसंपदा विभागात मंत्रीपद सांभाळले असून, दोन वेळा जावळी आणि दोन वेळा कोरेगावचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सध्या ते विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मुख्य प्रतोद आहेत.

पक्षातील त्यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांची लवकरच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता असून, १५ जुलै रोजी त्यांच्याकडे पदभार सोपवला जाईल.

error: Content is protected !!