Exclusive : आधी आयपीएस, नंतर आयएएस – सातार्‍याचे ओमकार पवार नाशिक झेडपी सीईओ

नाशिक : नाशिक । धडाकेबाज सनदी अधिकारी ओमकार पवार यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या ते नाशिक येथे उपविभागीय अधिकारी, इगतपुरी म्हणून कार्यरत आहेत. ओमकार पवार बुधवार, दि. ६ रोजी जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारणार आहेत.

सातार्‍याच्या जावळी तालुक्यातील सनपाने गावचे सुपुत्र असलेले ओमकार मधुकर पवार यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. २०२३ मध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांचे बालपण सनपाने गावी गेले. छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आले. अभ्यासात हुशार असल्यामुळे घरच्यांनी त्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रेरित केले. कॉर्पोरेट जीवनातील ग्लॅमर आणि चांगला पगार असूनही त्यांची ग्रामीण भागात राहून काम करण्याची इच्छा होती. भरपूर पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी अधिकारी व्हायचे ठरवले. मात्र चार प्रयत्नांत अपयश आले. गावात राहून त्यांनी अडचणींचा सामना करत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. अथक प्रयत्नांती आयपीएस होऊन केंद्रीय सशस्त्र दलात सहायक कमांडर पद मिळवले. पण त्यांना व्हायचे होते कलेक्टर. शेवटी १९४ रँकसह आयएएस होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

आपल्या प्रवासाबाबत ओमकार पवार म्हणाले :
पहिल्या चार प्रयत्नांत मी अपयशी झालो, परंतु जिद्द आणि प्रयत्नांनी मला यश मिळाले. यूपीएससीमधून पॅरामिलिटरी फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर आयपीएससाठी देखील निवड झाली होती. परंतु, आयएएस व्हायचं माझं स्वप्न होतं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली, पण प्रशासनात काम करायचे असल्याने मी पुन्हा अभ्यास करत परीक्षा दिली आणि यश मिळवले.

जावळी म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भूभाग असून या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसं कष्टाळू असून या मातीला गुणवत्तेचा सव्वास आहे. माझे वडील फोटोग्राफीचा व्यवसाय करायचे, तर आई नीलिमा शेतीकाम करतात. घरात तीन भावंडं – दोन बहिणी आणि मी असा परिवार आहे. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, सनपाने येथे झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, हुमगाव आणि कराड येथे झाले. पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्म झाल्याने शेतकर्‍यांच्या व्यथा मला चांगल्या माहिती आहेत. गावातील सर्वसामान्य माणसाला न्याय देता यावा, याकरिता मी सनदी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. २०२३ मध्ये गडचिरोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. गेल्या आठ महिन्यांपासून इगतपुरी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आता मला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मला इतकी मोठी संधी मिळेल, अशी पुसटशीही कल्पना नव्हती. पण मला ती संधी मिळाली.

आईला पोरानं बीडीओ व्हावं का वाटायचं?
ओमकार सांगतात, मी जेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आईला – का कुणास ठाऊक – पण मी बीडीओ (गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटत होतं. तिला त्यांचं काम काय असतं, याची काही कल्पनाही नव्हती. त्याचं झालं असं की 1994 साली आमच्या घरच्यांनी दुसर्‍याचं शेत करायला घेतलं होतं. तो व्यक्ती बीडीओ होता. तिने बघितलेले तेच सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. माझी आईही त्याला अपवाद नव्हती. ग्रामीण भागात लोकांना सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची. म्हणून मग ज्या दिवशी माझा आयएएसचा निकाल लागला, तेव्हा मी आईला हेच सांगितलं की ‘हे बीडीओसारखंच काम असतं’.


नाशिकमध्ये कुंभमेळा होतो आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे काम समजून घेत कामाला सुरुवात करणार आहे. जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील, तर सुतासारखा सरळ करेन.
ओमकार पवार, जि.प.सीईओ, नाशिक

error: Content is protected !!