नाशिक | १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन यांचीच नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, असे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
१७ जानेवारी रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांचे नियुक्ती करण्यात आली होतीपरंतु १९ जानेवारीला नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तींवर स्थगिती आली. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. त्यामुळे त्यानंतर परतल्यानंतर पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रायगड दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र अद्याप नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाच्या नियुक्तीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात नाशिकमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता, “ज्या जिल्ह्यांना पालकमंत्री नाही, त्या जिल्ह्यांचे पालकत्व मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे,” असे स्पष्ट करताना, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असेही त्यांनी सांगितले होते.
मात्र महाराष्ट्र दिन अगदी जवळ येऊन ठेपल्याने आणि अद्याप पालकमंत्री नियुक्ती न झाल्याने ध्वजवंदन कोणाच्या उपस्थितीत होणार याबाबत नाशिककरांमध्ये उत्सुकता होती. अखेर राज्य सरकारच्या आदेशाने गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांचीच अंतिम निवड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, नाशिककरांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.










