जिंदाल आग : चिंता वाढली, गावे रिकामे करण्याची तयारी सुरू

नाशिक । नाशिकमधील जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग तब्बल ३५ तासांपासून आटोक्यात आलेली नाही. आगीचा भडका गॅस टाकीच्या दिशेने वाढत असल्याने मोठा अनर्थ टळावा म्हणून प्रशासनाने कंपनीपासून सुमारे १५ किलोमीटर परिसर रिकामा करण्याची तयारी सुरू केली आहे.

या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट परिसरात पसरले असून, गॅस टाकीपर्यंत आग पोहोचल्यास ती फुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अत्यंत गंभीरपणे परिस्थितीचा आढावा घेत आहे. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी कंपनीच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

तसेच, नाशिक-मुंबई महामार्ग देखील काही वेळासाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो. महामार्गावरील वाहतूक दुसर्‍या मार्गावर वळविण्याचे नियोजन सुरू आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, ही अतिशय गंभीर बाब असून आम्ही सर्वजण यावर लक्ष ठेवून आहोत. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, कर्मचारी आणि यंत्रणा गेल्या दीड दिवसांपासून कार्यरत आहेत. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. यंत्रणा सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया
जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. आतमध्ये आग धुमसतेय आजूबाजूचा परिसर रिकामा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नुकसानीचा अंदाज लावणे कठिण आहे. मुख्यमंत्र्यांनीही माझ्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देखील या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत.
छगन भुजबळ, मंत्री, महाराष्ट्र राज्य

error: Content is protected !!