आगीचा भडका: गावं खाली करण्याचे आदेश, नागरिक बेघर!

नाशिक । इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून आग धुमसत असून आता या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. शर्थीचे प्रयत्न करूनही आगीची व्याप्ती वाढत असून आता कंपनीतील गॅस टाक्यांचा स्फोट होण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनानेही खबरदारी म्हणून आसपासच्या १५ किलोमीटर परिसरातील गावे खाली करण्याचे आदेश दिले असून यामुळे नागरीकांची धावपळ उडाली आहे.

कंपनीतील गॅस टाकीचा स्फोट झाल्यास १५ किलोमीटरचा परिसर उध्दवस्त होऊ शकतो. या गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून टाकीच्या परिसरात सातत्याने पाणी आणि फोमची फवारणी केली जात आहे.

काही तासांच्या अंतरांनी कंपनी आवारातून स्फोटांचे आवाज येत असल्याने आसपाच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कंपनीत पॉलिफिल्म बनविण्यासाठी असलेला कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरली आणि ती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

या आगीमुळे आसपाच्या १५ किलोमीटर परिसरातील गावांना धोका पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. आगीमुळे नागरीकांच्या सुरक्षेला धोका पोहचू नये याकरीता पसिरातील गावे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाने नागरीकांची एकच तारांबळ उडाली असून आपला घर संसार सोडून बेघर होण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. कंपनीजवळील मुंढेगाव पुणेपर्ण रिकामे झाले आहे. गावातील नागरीकांनी आपल्या कुटूंबाला घेवून आता दुसरीकडे धाव घेतली आहे. पाच हजार लोकवस्तीच्या या गावात शुकशुकाट दिसून येत आहे.

काय आहेत प्रशासनाने आदेश ?
आग मोठया प्रमाणात पसरत असल्याने कंपनीतील रासायनिक साहित्य व गॅस टाकी यांना त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या ३ किलोमीटर परिसर हा बाधित होण्याची तसेच मनुष्य व प्राणी यांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन किलोमीटर परिसरात जमाबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच धोकादायक वस्तू हातात घेउन नागरीकांनी फिरू नये. या परिसरात कोणतेही कार्यक्रम आयोजीत करू नये असे आदेश देण्यात आले आहेत. आग आटोक्यात येईपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!