नाशिक। निफाड येथे उभारल्या जाणार्या ड्रायपोर्ट व मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३.९९ हेक्टर खासगी जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवार (ता.७) रोजी भूसंपादन अधिसूचनेच्या अंतिम मुदतीपर्यंत चार शेतकर्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्यांनी प्रति एकर १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) मार्फत निफाड साखर कारखाना परिसरात १०८ हेक्टर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मध्य रेल्वेशी जोडण्यासाठी सुमारे ३.५ किमी लांबीचा नवीन रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गासाठी पिंपळस (३.४५ हेक्टर) व कसबे-सुकेणे (०.५४ हेक्टर) या गावांमधील खासगी जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे.
प्रशासनाने हरकतींना लेखी उत्तर देण्याची तयारी दर्शवली असून, भूसंपादन दर अंतिम करण्यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हिरवा कंदील मिळताच अंतिम अवॉर्ड जाहीर करून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.
भूसंपादन प्रकरणी चार हरकती दाखल झाल्या आहेत. सदरचे दर अंतिम करण्यासाठी नगररचना विभागाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यानंतर अंतिम अवार्ड जाहीर करण्यात येउन भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. साधारणपणे आठवडाभरात ही प्रक्रिया पुर्ण केली जाईल.
डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी, निफाड










