ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍याच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

नाशिक । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार (दि.२) रोजी नाशिक दौर्‍यावर येत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळया निमित्ताने सदिच्छा भेटीसाठी शिंदे येत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर याच सोहळयानिमित्त संजय राऊतही येणार असल्याचे समजते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १ आणि २ जून नाशिक दौर्‍यावर आहेत. मिळालेल्या माहीतीनूसार फडणवीस हे कौटुंबिक सोहळयानिमित्त नाशिकमध्ये आहेत. तर २ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील एका विवाह सोहळयानिमित्त नाशिकला हजेरी लावणार आहेत.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त सदिच्छा भेट देणार आहेत. केवळ सदिच्छा भेटीकरीता उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आखण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.त्यामुळे आता ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या राजकीय भूमिकेबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेतून वेगळा होत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला होता. त्यानंतर संजय राऊत हे त्यांच्या सर्वात प्रमुख टीकाकारांपैकी एक ठरले. या भेटीचा नाशिकच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठीही अशा भेटी उपयोगी ठरतात. त्यामुळे ही भेट नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरते की काय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

error: Content is protected !!