मृत्यू; वनविभागाची तात्काळ कारवाई
नाशिक । दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी गावात दुर्दैवी घटना घडली. स्वतःच्या शेतात घास कापत असताना पायल राजेंद्र चव्हाण (वय २१) हिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हल्ल्याची माहिती मिळताच दिंडोरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचले. पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. नातेवाईकांनी नंतर कु. पायल च्या पार्थिवावर रात्री उशिरा वनारवाडी येथे अंत्यविधी केला.
या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात ५ पिंजरे लावण्यात आले असून ९ ट्रॅप कॅमेर्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. तसेच दिंडोरी व परिसरात दिवस व रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. नाशिक येथून बचाव पथक व फिरते पथकही तात्काळ पाचारण करण्यात आले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेस थर्मल ड्रोनचा वापर करून बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण सुरू आहे. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून, त्यांची भीती दूर करण्यासाठी वनविभागाकडून सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.
कोट
वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे, तसेच कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच संवेदनशील क्षेत्रात दिवस व रात्रीच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. मदतीकरीता नाशिक येथून बचाव पथकास, तसेच फिरत्या पथकास पाचारण करण्यात आलेआहे. वनविभागामार्फत रात्रीचे वेळी थर्मल ड्रोनचा वापर करून, बिबट्याच्या हालचालींची नोंद ठेवण्यात येत आहें. परिसरात एकूण 9 ट्रॅप कॅमेरा, तसेच 5 पिंजरे बसविण्यात आले आहेत.
संतोष सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक, पूर्वभाग







