‘फॉर्च्युनर’ वर हुंडाबळीचा डाग? शेतकर्‍याने बघा वाहनावर काय लिहील…

सोलापूर । वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्यभरात एकाच वेळी दोन विषय चर्चेत आले – हुंडाबळी आणि फॉर्च्युनर. या प्रकरणात हुंड्यासोबत देण्यात आलेल्या महागड्या गाडीमुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून, ग्रामीण भागात ही गाडी पाहिली की ही हुंड्यात मिळालेली असेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका शेतकर्‍याने आपल्या फॉर्च्युनरवरील शंका आणि व्यथा गाडीवरच लिहून व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या गाडीच्या मागच्या काचेकडे वेधले गेले आहे.

फॉर्च्युनरवर शंका, मग थेट उत्तरच गाडीवर!
अतुल भाऊ या शेतकर्‍याने आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर लिहिले आहे:
“तशी तर मी मोठ्या घरची राणी,
मात्र बदनाम केलं मला ‘हगवणे’ यांनी!
मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा,
हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा!
अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय
पण हगवणेमुळे ‘फॉर्च्युनर’ जातीला लोकांनी धु धु धुतलंय!

या मजकुरामुळे अतुल भाऊंनी केवळ स्वतःची भूमिका स्पष्ट केली नाही, तर ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक चर्चेला एक सटोरी पण टोचणारा प्रतिसाद दिला आहे.

प्रतिष्ठेचं प्रतीक की हुंड्याचं अपमानकारक रूप?
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी हुंड्यात फॉर्च्युनर दिल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे ही गाडी शशांक हगवणे याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली होती. त्यामुळे ही घटना केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित न राहता, ती सामाजिक आणि राजकीय चर्चेचा भाग बनली आहे.

आता ग्रामीण भागात फॉर्च्युनर ही प्रतिष्ठेचं नव्हे, तर संशयाचं प्रतीक ठरू लागली आहे. गाडी बघितली की विचारलं जातं – ‘ही हुंड्यात आली का?’ अशी भावना अनेक गाडीधारकांमध्ये निर्माण झाली आहे.

समाजाला टोचणारा संदेश
अतुल भाऊंसारख्या शेतकर्‍याने रोखीत गाडी विकत घेतली असूनही गावकर्‍यांच्या नजरा आणि शंका त्याच्यावरच असल्यामुळे तो गाडीवरच आपली खंत लिहून मोकळा झाला. त्याच्या या कृतीतून समाजातील मानसिकतेवर आणि हुंडाप्रथेमुळे आलेल्या सामाजिक विद्रूपतेवर भाष्य केलं गेलं आहे.

error: Content is protected !!