डॉक्टर्स संघटना ११ जुलैपासून आरोग्य सेवा ठेवणार बंद ; काय आहे कारण ?

नाशिक । एक वर्षाचा औषधशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) अंतर्गत नोंदणी देण्याच्या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिक शाखेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामुळे अ‍ॅलोपॅथिक वैद्यकीय व्यवसायाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तसेच रुग्णांच्या सुरक्षेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत वैद्यकीय संघटनांनी मांडले आहे.

या पार्श्वभूमीवर आयएमए नाशिक शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून, ही विवादित अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ११ जुलै रोजी सकाळी ८ ते दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तास सर्व वैद्यकीय सेवा (आपत्कालीन सेवा वगळता) बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

काय आहे वादग्रस्त निर्णय?
एमएमसीने ३० जून २०२५ रोजी अधिसूचना जारी करत, एक वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टिससाठी परवानगी देत त्यांच्या नावांची नोंदणी एमएमसीच्या रजिस्टरमध्ये करण्याची मुभा दिली आहे. यावर IMA आणि संबंधित वैद्यकीय संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

वैद्यकीय संघटनांचा आक्रोश
IMA नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. निलेश निकम यांनी सांगितले की, हा निर्णय एमबीबीएस आणि होमिओपॅथिक डॉक्टर यांच्यातील सीमारेषा पुसून टाकणारा असून, यामुळे रुग्ण भ्रमित होऊ शकतात. त्यांनी असेही स्पष्ट केले की, जर एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरने एखादा अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, तर त्याचा उल्लेख त्यांच्या पदवीसोबत करता येईल. पण त्यांची नोंदणी अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांच्या रजिस्टरमध्ये होऊ नये.

कायदेशीर प्रक्रियेसाठी तयारी
IMA च्या म्हणण्यानुसार, या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाचा निर्णय न्यायालयाचा अवमान करणारा ठरू शकतो. त्यामुळे एमएमसीने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा रोखून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या निवेदनप्रसंगी IMA चे सचिव डॉ. मनिषा जगताप, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या डॉ. नेहा लाड, बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर भालेराव, डॉ. परीक्षित पाटील, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. अनिता भामरे, डॉ. शलाखा बागूल, सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नागेश मदनुरकर, डॉ. प्रतिभा बोरसे यांच्यासह इतर वैद्यकीय पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!