मुंबई : राज्यातील वाहनसंख्येत झपाट्याने होणारी वाढ आणि त्यासोबत निर्माण होणारी पार्किंगची समस्या लक्षात घेता राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच नवी पार्किंग पॉलिसी लागू केली जाणार असून, सुरुवात मुंबई महानगर प्रदेश (MMR) भागापासून होणार आहे. याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
वाढत्या शहरीकरणाबरोबर जागेची कमतरताही जाणवू लागली आहे. दररोज हजारो वाहने रस्त्यावर उतरत असल्याने पार्किंगच्या समस्याही वाढत आहेत. तुम्ही परदेशात जातात तेव्हा रस्त्यावर कुठेही आणि कशीही वाहने उभी केलेली दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी अभावानेच दिसते. याउलट आपल्या देशात चित्र असते. परंतू अनियमित पार्किंग कमी करण्यासाठी अनेक देशांनी पार्किंग धोरण स्विकारले आहे. नागरिकांनी स्वतःच्या मालकीचे किंवा भाडेतत्वावरील पार्किंग उपलब्ध असल्याचा पुरावा सादर केल्याशिवाय नवीन वाहन खरेदी करता येत नाही. आता महाराष्ट्रातही लवकरच नवी पार्किंग पॉलीसी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
त्यानूसार पार्किंगची निश्चित जागा असेल, त्यालाच वाहन रजिस्ट्रेशन देता येईल, असा ठाम निर्णय सरकारने घेतला आहे. या धोरणामुळे वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नागरी असुविधा यावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरनाईक म्हणाले, अनेक प्रगत देशांत पार्किंग पॉलिसी सक्तीची आहे. ती आपल्या राज्यातही अमलात आणणार आहोत. एमएमआर भागात ती प्रथम राबवून नंतर राज्यभर लागू केली जाईल. या बैठकीत परिवहन विभागातील अंतर्गत बदल्यांवरही चर्चा झाली. बदल्या ऑनलाईन पद्धतीने पार पाडल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः गर्भवती महिलांच्या बदल्यांमध्ये संवेदनशीलतेने निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, एमएमआर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पालाही गती देण्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत प्रकल्पास हिरवा कंदील मिळाला आहे, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.










