Nashik Rain Update : गंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार, या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

नाशिक । नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार सुरू होती. याचा परिणाम म्हणून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. गंगापूर धरणातून सकाळी २३२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र पाणलोट क्षेत्रात पासाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून सायंकाळी ५ वाजता ३,९४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या धरण परिचालन सूचीनुसार पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाणीपातळी वाढून गोदाकाठची अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा गोदावरीला पूरस्थिती निर्माण झाली.

गुरुवारी धो-धो कोसळल्यानंतर शुक्रवारी थोडी विश्रांती मिळाल्याचे दिसले होते, मात्र शनिवारी सकाळपासूनच पुन्हा संततधार सुरू झाली. गुरुवारी गोदाकाठावरील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत आलेले पाणी शुक्रवारी पायापर्यंत उतरले होते, परंतु नव्याने झालेल्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला.

२४ तासांत १४९ मिमी पावसाची नोंद
शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ या २४ तासांत नाशिक जिल्ह्यात सरासरी १४९ मिमी पावसाची नोंद झाली. दरवर्षी २१ जूनपर्यंत सुमारे १२२ मिमी पावसाची नोंद होते, मात्र यंदा ती ओलांडून १४९ मिमीवर पोहोचली आहे.
तालुकानिहाय पावसाचा तपशील असा:
त्र्यंबकेश्वर: ३३६.४ मिमी
इगतपुरी: २६० मिमी
पेठ: २४१ मिमी
सुरगाणा: २०० मिमी
निफाड: १५० मिमी
सिन्नर: १४० मिमी
चांदवड: १३० मिमी
येवला: १३४ मिमी
कळवण: १२५.९ मिमी
दिंडोरी: १७१ मिमी

धरणातून सुरू असलेला विसर्ग
दारणा : ४,७४२ क्युसेक
नांदूरमध्यमेश्वर : ९,४६५ क्युसेक
कादवा : ५३० क्युसेक
होळकर पूल (गोदावरी): ३,५९० क्युसेक

जायकवाडी धरणात दीड टक्क्यांनी साठा वाढला
नाशिकमधील चार प्रमुख धरणांतून पाणी जायकवाडी धरणात पोहोचत आहे. सध्या नांदूरमध्यमेश्वरमार्गे १४,००० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात एकाच दिवसात दीड टक्क्यांनी साठा वाढला असून सध्या ३१.१८ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. आतापर्यंत नाशिकहून सुमारे २ हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

error: Content is protected !!