जि.प. आदर्श शाळा अंदरसुलमध्ये डिजिटल शिक्षणाची क्रांती

नांदगाव । तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात डिजिटल माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या पुढाकाराने नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा ृ, अंदरसुल येथे अत्याधुनिक “आदर्श संगणक प्रयोगशाळा” कार्यान्वित करण्यात आली आहे.

ही प्रयोगशाळा विद्यार्थिनींच्या सर्वांगीण आणि भविष्यमुखी विकासासाठी एक महत्त्वाची पायरी ठरत आहे. एकूण २५ संगणक सेटअप या प्रयोगशाळेत बसविण्यात आले असून, त्यापैकी २४ विद्यार्थिनींसाठी आणि १ शिक्षकांसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच, ६५ इंचाचा IP पॅनल डिस्प्ले, स्मार्ट सॉफ्टवेअर आणि एनिमेटेड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण अधिक मनोरंजक, प्रभावी आणि सहभागीतेने भरलेले झाले आहे.

‘शिकवणे’ ऐवजी ‘शिकणे’
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशनच्या स्वरूपात संगणकावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता, स्वअभ्यास, स्वमूल्यांकन आणि संवादात्मक शिक्षण अनुभवता येणार आहे. परीक्षा देखील संगणकाद्वारे घेण्याची सुविधा यात समाविष्ट आहे.

– बहुभाषिक शिक्षणाचा प्रारंभ
शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगळ यांनी सांगितले की, विद्यार्थिनींना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने जपानी आणि जर्मन भाषा शिकविण्याचा उपक्रम लवकरच सुरु होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा भाषिक, बौद्धिक व व्यावसायिक विकास अधिक गतिमान होणार आहे.

विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास
या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या शिक्षणात नवा आत्मविश्वास व उत्साह संचारला आहे. संगणक हाताळताना त्यांच्या चेहर्‍यावर आम्ही आता आमचे भविष्य घडवत आहोत हा भाव स्पष्टपणे दिसून येत आहे. ही प्रयोगशाळा केवळ तंत्रज्ञान शिक्षणाचे केंद्र नसून, विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यातील प्रवेशद्वार ठरत आहे.

error: Content is protected !!