शिंदेंनी शहांच्या चरणी डोकं ठेवून घेतली मुख्यमंत्रीपदाची मागणी? राऊत यांचा आरोप

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला की, शिंदेंनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या चरणी डोकं ठेवून त्यांची ‘गुरुपौर्णिमेची’ पूजा केली. यावेळी शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याचे राऊत म्हणाले.

शहांना दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर?

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांनी अमित शहांना अशी ऑफर दिली की, “मराठी माणसांमध्ये एकी वाढत चालली आहे, ती जर कायम राहिली तर भाजपसाठी धोका होईल. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा, मी ही एकजूट थांबवतो.” यावर शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच राहील, असं स्पष्ट केल्यावर शिंदेंनी संपूर्ण गटासह भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शवली, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.

दिल्लीशिवाय शिंदे गट चालत नाही

राऊतांनी शिंदे गटावर टीका करताना म्हटलं की, “शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख नेते हे दिल्लीत किंवा गुजरातमध्ये आहेत. हा गट दिल्लीतील राजकीय शक्तींनी उभारलेला आहे. शिंदे काही शिवसेनाप्रमुखांच्या समाधीसमोर जाऊन निर्णय घेत नाहीत.”

ऑगस्टमध्ये मोठी उलथापालथ होणार

“मी आयकर विभागाच्या नोटिशी गांभीर्याने घेत नाही. ती फक्त एक इशारा आहे,” असं सांगत राऊतांनी पुढे दावा केला की, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल घडतील. “शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर लवकरच तपास यंत्रणांचा धाडसत्र सुरू होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

शिरसाट व्हिडीओ आणि ९५ हजार कोटींचे टेंडर घोटाळे

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मंत्री संजय शिरसाट एका बँगसह दिसत आहेत आणि त्या बँगमध्ये पैशाचे बंडल असल्याचा आरोप राऊतांनी केला. त्याचबरोबर त्यांनी असा दावा केला की, ९५ हजार कोटी रुपयांची सरकारी कामं टेंडर न काढता वाटली गेली असून, संबंधित ठेकेदारांकडून पैसे घेण्यात आले आहेत. यापैकी काही ठेकेदार आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

error: Content is protected !!