पंचवटी । भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी १९९२ च्या सिंहस्थ कुंभमेळयात उभारण्यात आलेले रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडण्यास सुरूवात झाली आहे. शनिवार (दि.११) पासून वस्त्रांतरगृह पाडकाम सुरू करण्यात आले. आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
वस्त्रांतरगृह बांधल्यापासून वादात आहे. पुरोहित संघाकडे ताबा असण्यावरून प्रथम वाद होता. त्यानंतर रामतीर्थ समिती व पुरोहित संघात वाद निर्माण झाले. वस्त्रांतरगृह व तेथे भाविकांची होत असलेल्या लुटीबाबतही तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्व बाबींचा विचार करून वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आली होती.
१९९२ ला वस्त्रांतरगृहाचा ताबा पुरोहित संघाकडे देण्यात आला होता. तीन वर्षांसाठी हा ताबा होता. १९९५ ला करारनामा नुतनीकरण करण्यात आले नाही. वस्त्रांतरगृह ताब्यात घेतल्यापासून ३८ लाख ७१ हजार रूपये भाडे थकले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी नियंत्रणाच्या अनुषंगाने वस्त्रांतरगृह पाडण्याचा प्रस्ताव पुढे आला. यावरून बरेच वादविवाद, मतमतांतरे झाली परंतू अखेर, प्रशासनाने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार शनिवार (दि.११) रोजी सकाळपासून पुन्हा एकदा जेसीबीच्या मदतीने पाडण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान वस्त्रांतगृहाचे पाडकाम सुरू करण्यापूर्वी गुरूवारी (दि.९) वस्त्रांतरगृहा भोवती पत्रे उभारण्यात आले. जेणेकरून काम सुरू असताना नागरिकांची या ठिकाणी वर्दळ बंद राहावी, तसेच लवकर काम पूर्ण करता यावे. तसेच वस्त्रांतरगृहा खाली असलेल्या मंदिरांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू नये यासाठी त्याभोवती वाळूने भरलेल्या गोण्या रचण्यात आल्या आहेत.
महापालिकेने स्मार्ट सिटी व महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना बोलावून त्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि वीज मीटर काढून घेण्यास सांगितले. तर महापालिकेच्या मालकीचे असलेले लोखंडी लॉकर व पुरोहितांचे त्या ठिकाणी असलेले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर इमारत पाडण्यास सुरूवात केली गेली.










