नाशिक : सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात आमदार देवयानी फरांदे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे आणि मलनिस्सारण केंद्राच्या दूरवस्थेबाबत पुरवणी मागण्यांद्वारे मुख्यमंत्र्यांचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यात प्रामुख्याने नाशकात होणा-या सिंहस्थात शहरातील खड्डे, नाशिक-त्रस्ता आणि शहरातील मलनिस्सारण केंद्रांच्या वाहिन्यांचा मुद्दा गाजला.
नगर विकास विभागाच्या २०२५-२६ पुरवणी मागण्यांवरील बाब क्र. ८६, ८७, ८८, ८९, ९० यावर बोलताना आ. फरांदे म्हणाल्या की, नाशकात सिंहस्थ भरणार आहे. नगर विकास विभागाच्या माध्यमातून शासनाने विविध कामांसाठी १ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.त्यात विविध विभागाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. परंतु १ हजार कोटी रुपये निधी त्या कामांसाठी अपुरा पडणार आहे. त्यामुळे निधीत वाढ होणे गरजेचे आहे.
नाशिक शहरातील सर्व सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटचे म्हणजेच एसटीपी किंवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे आपण अपग्रेडेशन करत आहोत. त्यातील मलवाहिका ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. फुटलेल्या आहेत. त्यामुळे मूळ वाहिन्या बदलणे महत्त्वाचे आहे. त्यातले दूषित पाणी गोदावरी आणि नंदिनी नदीत मिसळते. यामुळे नद्यांसह भाविकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. काही दिवसांतच सिंहस्थ सुरू झाला तर शहरात भावोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्पांच्या वाहिन्यांवर आणखी दाब येईल. त्या आणखी खराब होतील. त्यामुळे या नद्यांमध्ये मिसळणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सिंहस्थाच्या आराखड्यात या कामाचा समावेश व्हावा. त्यासाठी ११००कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी व गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी मुख्यमंत्री आणि नगर विकासाला विनंतीदेखील आ. फरांदे यांनी केली.
नाशिक-वणी रस्त्याचे चौपदरीकरण करा
लक्षवेधीत पुढे बोलताना आ. फरांदे यांनी रस्त्यआंच्या कामांवर प्रकाशझोट टाकला. त्यात पंधरा दिवसांपूर्वी नागपूरला ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात सिंहस्थाच्या रस्त्यांवर चर्चा झाली. नाशिकला जोडणा-या रस्त्यांचे जाळे विणले आहे. त्यासाठी कोट्यवधींचे कामे मंजूर झाले आहे. असे सांगण्यात आले. मात्र सिंहस्थाळ येणारे भाविक त्र्यंबकेश्वरला जातील. तसेच सप्तशृंगी गडावरही आदिमायेच्या दर्शनासाठी जाणारच. त्यामुळे हा रस्ता एममधून वगळून नाशिक ते वणी रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी ना. गडकरींकडे यानिमिताने केली.
नाशिकचे खड्डे गाजले
नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ हजार कोंटींचे बजेट नगरविकास विभागाला दिले आहे. मात्र, रस्ते आणि पुलांंच्या दुरुस्तीसाठी नाशिक शहराला आणखी ५०० कोटींचा निधी आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास भरपूर निधी उपलब्ध केला आहे. कोट्यवधींचे रस्ते निर्माण होतात. पण ते वर्षातच खराब होतात. दर पावसात ते रस्ते तपासायला हवेत आणि संबंधित ठेकेदारांकडून तीन वर्षांत त्यांी दुरुस्ती करण्यात यावी असेही आ. फरांदे म्हणाल्या.
महापालिकेत अभियंत्र्यांची वानवा
आकृतीबंधाच्या जाचक अटींंअध्ये नाशिक महापालिका अडकली आहे. आकृतीबंधाच्या आराखड्यांमध्ये मनपाच्या अनेक विभागात कनिषन्भियंते नाहीत. ३० वर्षांपासून भरती झालेली नाही. नाशिक मनपाची बिंदू नामावली, आकृतीबंध मंजूर नाही. त्यामुळे ते तत्काळ मंजूर करावेत आणि अभियंत्यांची रिक्त पदे भरावीत, असेही आ. फरांदे म्हणाल्या.
अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी
नाशिक शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्याच्या नगररविकास मंत्र्यांनी वाहतुकीचा नियोजन आराखडा करुन मोठा निधी द्यावा. तसेच समृद्धी नागपूर ते मुंबई पर्यंत आहे. आम्ही नाशिकसाठी इगतपुरीहून त्याला जोडले जातो. नाशिकहून ४० मिनिटात पडघ्यात पोहोचतो; पडघा ते ठाणेपर्यंत २ तास लागतात. पडघ्याजवळ पनवेलला जाणारा रस्ता आहे. तिथे अटलसेतूलात्रस्ता जोडला गेला तर एक तासात आम्ही मंत्रालयात पोहोचू असेही फरांदे यांनी सांगितले.
शासकीय निवासस्थानांचे ऑडिट करा
नाशिक पश्चिम या माझ्या मतदारसंघात अनेक शासकीय निवासस्थाने आहेत. ती जवळपास १०० वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे व दुरुस्ती करावी. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी, अशी मागणीही यावेळी केली.









