अंबड एमआयडीसीमध्ये कंटेनरला आग

नाशिक । नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरच्या टायरला अचानक आग लागल्याने कंटेनरला भीषण आग लागण्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरच्या टायरला अचानक आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण कंटेनरने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागलेला कंटेनर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाजवळ उभा होता, त्यामुळे आग वाढली असती तर गोदामातील मालाला मोठे नुकसान झाले असते. अग्निशमन विभागाच्या वेळीच झालेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

नाशिकमध्ये सध्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर कंटेनर आणि अवजड वाहने मालवाहतुकीसाठी वापरली जातात. मात्र, या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने ती मोकळ्या जागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभी केली जातात.
सावली अभावी ही वाहने सतत उन्हातच उभी राहतात, यामुळे टायरचा तापमानामुळे स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.

सदरील कंटेनर देखील अशाच परिस्थितीत उभा असताना त्याच्या टायरने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना इशारा देणारी आहे. वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित जागेची आवश्यकता यानिमित्ताने अधोरेखित झाली असून, स्थानिक प्रशासन व औद्योगिक वसाहतीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!