नाशिक । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये सावरकरांविषयी जाहीरपणे आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप करत निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना कायदेशीर समन्स बजावले होते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी त्यांना प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या वकिलांनी उपस्थितीबाबत सवलत देण्याची विनंती केली होती आणि कायमस्वरूपी सवलतीसाठीही अर्ज दाखल केला होता.
ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकत नाही; प्रत्यक्ष हजर राहूनच जामीन घ्यावा लागेल, असे अॅड. मनोज पिंगळे यांनी न्यायालयात स्पष्ट केले. न्यायालयाने ही बाब मान्य केली.
गुरूवार दि.२४ रोजी नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. याचिकाकर्ते देवेंद्र भुतडा यांच्यावतीने अॅड. मनोज पिंगळे तर राहुल गांधी यांच्यावतीने अॅड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले.










