नाशिक । राज्याच्या सामाजिक एकतेला सुरुंग लावणार्या प्रवृत्तींचा निर्णायक विरोध करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. महाराष्ट्राला मिळालेला शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार जपण्यासाठी ‘सद्भावना यात्रा’ आणि सत्याग्रहांचे आयोजन करण्यात येत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नाशिक येथे बोलतांना सपकाळ म्हणाले, मागील काही महिन्यांत राज्यात जातीय तणाव व सामाजिक विघटनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सद्भावना हा आपल्या राज्याचा पाया आहे. मात्र, आज ‘आपल्याच जातीच्या दुकानातून खरेदी करा’, ‘आपल्याच जातीच्या कार्यक्रमात सहभागी व्हा’ अशा विघटनवादी अपप्रवृत्तींना खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. सपकाळ यांनी सांगितले की, या पार्श्वभूमीवर बीड, नागपूर येथे सद्भावना यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आता नाशिकमध्ये देखील एक यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रांचा उद्देश कोणत्याही एका घटकावर टीका करणे नसून, महाराष्ट्रातील एकात्मतेचा आवाज बुलंद करणे आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यात परळीत सत्याग्रह, परभणीत यात्रा आणि इतर जिल्ह्यांमध्येही अभियान राबवले जाणार आहे.
नाशिक दंगलप्रकरणी सुस्पष्ट भूमिका
अलीकडील नाशिक दंगलप्रकरणी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, दोषींना शिक्षा झाली पाहिजेच, पण ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही त्यांना विनाकारण गुंतवू नये. मदत करणार्यांवर गुन्हे दाखल होणे ही अन्यायकारक बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर राखून चौकशी व्हावी आणि निष्पक्ष न्याय व्हावा, हीच आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
पेहलगाम घटनेवर कठोर भूमिका
पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेचा निषेध करत काँग्रेसने राष्ट्रहितास प्राधान्य दिले आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद अधिवेशन बोलावण्यासाठी पत्र दिले असून, काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सपकाळ म्हणाले.
ईडी कार्यालयातील आग – संशयास्पद घटना
मुंबईतील ईडी कार्यालयात लागलेल्या आगीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तपास चालू असताना सुरक्षा यंत्रणांमध्ये असे अपयश कसं? फायर ऑडिट झालं होतं का? यावर खुलासा होणे आवश्यक आहे. नागरिकांचा या संस्थांवरील विश्वास ढळू नये यासाठी उत्तरदायित्व स्पष्ट पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.
कॉमनवेल्थ प्रकरणावरून भाजपवर टीका
कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणात सुरेश कलमाडी यांना दिलासा मिळाल्याबद्दल बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्याकाळी फक्त राजकीय हेतूने आरोप करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आज मात्र त्याच प्रकरणावर भाजपकडून मौन बाळगले जात आहे,असे त्यांनी सांगितले.
५० लाखांच्या मदतीचं स्वागत
राज्य शासनाकडून घोषित केलेल्या ५० लाख रुपयांच्या मदतीचं स्वागत करताना सपकाळ म्हणाले, “घोषणा महत्त्वाच्या असल्या तरी अंमलबजावणी वेळेत झाली पाहिजे. अन्यथा ही मदतही केवळ कागदावरच राहील.











