मुंबई । राज्य सरकारने शालेय शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरात हिंदी भाषा सक्तीला जोरदार विरोध झाल्यानंतर सरकारने पहिलीपासून हिंदी विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंबंधी सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून त्यामध्ये हिंदी विषय वगळण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांच्या साप्ताहिक तासिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या उपयोजित विषयांमध्ये अधिक वेळ देता येणार आहे, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने सर्व शाळांना नवीन तासिका विभागणीनुसार लवकरात लवकर वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार शालेय दिनक्रम अधिक सुसंगत आणि विद्यार्थी-केंद्रित होणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
यापूर्वी, पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा निर्णय जाहीर होताच, राज्यभरात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पालक संघ आणि शैक्षणिक तज्ज्ञांनी त्याला तीव्र विरोध केला होता. या जनतेच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय मागे घेत सुधारित धोरण राबवले आहे.










