आ. रोहित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत

नाशिक-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हा प्रभारी आमदार रोहित दादा पवार, जिल्हा निरीक्षक सुनील भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आग्रा हायवे वरील हॉटेल सूर्या येथे संपन्न झाली. यावेळी आगामी निवडणुकांच्या रणनीती बाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत आ. रोहित पवार यांनी समविचारी पक्षाना सोबत घ्या अन्यथा स्वबळाची तयारी ठेवा असे आदेश दिले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, अत्यंत संघर्षाच्या काळात आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार साहेबांसोबत आहात याचा आनंद होत असल्याचं मत आदरणीय रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आगामी काळात पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांबाबत कल्पना या आढावा बैठकीत देण्यात आली. आगामी होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींना गांभीर्याने घेण्याचा सल्ला रोहित पवार यांनी दिला. सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नवीन बांधणी केली जाईल याबाबतचे आश्वासन देण्यात आले.

येत्या 10 जून रोजी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची चर्चा करा व जर ते तयार असतील तर एकत्र निवडणुका लढवा आणि त्यांनी जर सहमती दर्शवली नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा अशी सूचना रोहित दादा पवार यांनी दिली. पक्ष वाढीसाठी पक्ष बांधणी साठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.


या बैठकीसाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, प्रदेश प्रवक्ते विलास लवांडे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, सुरेश दलोड, बी वाय पगारे, माजी आमदार दीपिका चव्हाण, महिला अध्यक्ष संगीता पाटील, महिला शहराध्यक्ष अनिता दामले, युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे, युवक शहराध्यक्ष नितीन (बाळा) निगळ, सरचिटणीस मुन्ना अन्सारी, आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!