नाशिक । नाशिक जिल्हा न्यायालयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनही आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. खरं म्हणजे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे परंतु उद्धवजी माझ्यासोबत नाहीत, खरं म्हणजे योग नव्हता असे सांगत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलले.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भूषण गवई म्हणाले की, न्यायालयीन सुविधांबाबत महाराष्ट्रावर नेहमीच टीका होत होती. परंतु महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारती बघितल्या तर त्यांना कॉर्पोरेट लुक मिळालेला दिसून येतो. नाशिकला सुंदर आणि आधुनिक इमारत मिळाली आहे. देशात कुठेही अशी इमारत नाही असा गौरव त्यांनी केला.
मी देशाच्या विविध भागात जात असतो कोल्हापूर, अमरावती, नागपूर न्यायालयाच्या इमारतींचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. दर्यापूर या माझ्या तालुक्यातील न्यायालयीन इमारत तर राज्यातील कोणत्याही तालुक्यात नसेल इतकी सुंदर इमारत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचे मी कौतुक करतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, आपल्या केससाठी नाही पण नाशिकच्या कोर्टाची इमारत बघितली पाहिजे. समोर हेरिटेज बिल्डिंग आहे. त्यामागे नवीन इमारत आहे. हेरिटेज कक्ष तयार केला. त्यात दुसर्या, तिसर्या पिढीने योगदान दिले. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात सांगितले होते की, एक व्यक्ती एक मत या आधारावर काम केले जावे. राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाही एकत्र येत नाही, तोपर्यंत उपयोग नाही, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
सामाजिक आणि आर्थिक समानता राखणे गरजेचे आहे. आपल्या राज्यघटनेने जो प्रवास केलाय तो चांगला केलाय. सामाजिक आणि आर्थिक समानता येईल यासाठी कायदे करण्यात आले. सामाजिक समानता राहील, यासाठी आपण पुढे काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन २०१९ माझ्या हस्ते करण्यात आले. न्यायालयीन पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक राहिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी माझ्यासोबत होते. तेव्हा ते म्हणाले होते की, उद्घाटनही आपल्या हस्ते व्हावे. झालेही तसेच परंतु या मंचावर उद्धव ठाकरे सोबत नाहीत असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.











