Chhagan bhujbal : भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, लवकरच भूमिका जाहीर करणार

नाशिक : राज्य सरकारने मराठा आरक्षणावर घेतलेल्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे छगन भुजबळ लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, परंतु ओबीसींच्या हक्कावर गदा येता कामा नये अशी भुजबळ यांची भूमिका असून समता परिषदेने या भूमिकेचे समर्थन करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भुजबळ मंत्रीमंडळात असोत किंवा नसोत, ओबीसी लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांच्यासोबत राहू. त्यांच्या नेतृत्वात यापूर्वीही ओबीसींसाठी निर्णायक संघर्ष झाला आहे आणि आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर असलेला धोका दूर करण्यासाठी समता परिषद विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!