राज्यातील हवामानात बदल – काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असतानाच, आता पुन्हा कोकण किनारपट्टीसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान पोषक बनू लागले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली असून यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

कोणत्या भागात किती पाऊस?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट दिला गेला आहे. या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

वादळी वाऱ्यांची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच घाटमाथ्यांवर काळे ढग जमले असून, पूर्व विदर्भातही काही भागांत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवसांचा अंदाज

हवामान विभागाने पुढील चार दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र तळ कोकण व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता असून, अलर्ट जारी केला जाऊ शकतो. उर्वरित भागात मात्र मुख्यतः हलक्या सरींचा अंदाज आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

वादळी वाऱ्यांसोबत विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. शेतकरी बांधवांनीही आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

error: Content is protected !!