दिंडोरी हादरवणार्‍या आवाजाचे कारण उघड

नाशिक । दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिंडोरीसह आसपासच्या 25 किलोमीटर परिसरात हा आवाज ऐकू आला. आवाज इतका प्रचंड होता की, अनेक घरांच्या काचा फुटल्याच्या घटना देखील समोर आल्या. तर काही घरांना मोठा हादराही बसल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडून नेमका आवाज कसला झाला, याचा शोध सुरू असून आता या आवाजाचे कारण समोर आले आहे.

शहरालगत असलेल्या हवाई दलाच्या ओझर हवाई केंद्रातून सातत्याने विमानाची चाचणी घेतली जाते त्यामुळे शहरांमध्ये सातत्याने विमानांची वाहतूक चालूच असते परंतू शहराच्या सीमेलगत ओझरमधील सुपर सोनिक या विमानाच्या चाचणी दरम्यान हे आवाज येत असतात.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, झालेल्या घटनेसंदर्भात एचएएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलणे झालेले आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे.सुखोई विमानाचा साँनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जेव्हा सुखोई विमान प्रवास करते, त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज होतो. या आवाजाने तिथल्या आजूबाजूच्या वातावरणात भीती निर्माण होण्याची शक्यता असते, तसाच प्रकार दिंडोरीत घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलीही दुर्घटना दिंडोरीच्या परिसरात झालेली नाही. विमान जवळून गेल्याने खूप मोठा आवाज झाला होता. याबाबतचा अधिक तपास आम्ही करत आहोत. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!