नाशिक । अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी होत असते. मात्र फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदुषण आणि वायू प्रदूषणातही वाढ होत असल्याने यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे फटके वाजवतांना या नियमावलीचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दिवाळी सण म्हणजे फटाक्यांची जोरदार आतषबाजी. दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी नाशिककर सज्ज होत असून जिल्हाभर फटाक्यांचे स्टॉल सजू लागले आहेत. परंतु फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण वाढू नये, आपत्कालीन घटना घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक असून याकरीता जिल्हा प्रशासनाने अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी व हवेचे प्रदुषण होते. याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तसेच पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आदेश काढले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्यांना कारावासासह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रसाद यांनी दिला आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- १२५ डेसीबल आवाज निर्माण करणार्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी
- फटाका परवाना देताना तो मोकळ्या जागेत असेल अशा ठिकाणी द्यावा
- फटाक्यांची दुकाने जमिनीलगतच असावीत.
- प्रत्येक स्टॉलमध्ये ५० किलो ग्रॅम फटाके आणि ४०० किलोग्रॅम शोभेच्या फटाक्यांपेक्षा अधिक साठा नसावा.
-एकापेक्षा अधिक स्टॉल असतील तर त्यांची प्रवेशद्वारे समोरासमोर नसावीत. - एका ठिकाणी १०० हून अधिक स्टॉल नसावेत.
- विद्यूत प्रवाह वायरिंग योग्यरितीने केली आहे याकडे लक्ष द्यावे
- फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी
- अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था व अग्नप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी
- खराब स्थितीतील फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- २५ ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे, ३.८ सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचे
- अॅटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणार्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही
- तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय यांसारख्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही.
- फटाक्यांची माळ १० हजारपेक्षा अधिक फटाक्यांची असू नये
- किरकोळ फटाके विक्री करणार्यांनाही हे नियम लागू राहतील









