नाशिक । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजारोहणास नकार दिल्यानंतर आता नाशिकमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ हे दोघेही नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. भुजबळ हे नाशिकमधील मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण करणार आहेत.
याआधी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गोंदिया येथे ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अर्थात नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या या निर्णयाची चर्चा रंगली आहे. नाशिकला ध्वजारोहणाची संधी न दिल्याने भुजबळ नाराज असल्याचे बोलले जाते. नाशिकमध्ये कोण ध्वजारोहण करणार याविषयी उत्सुकता होती. शासनामार्फत या संदर्भात नावे जारी करण्यात आली. यात नाशिकला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना संधी देण्यात आली.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजपने दावा केला आहे. तर शिंदे गटही शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे. अशातच नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या या निर्णयाची चर्चा रंगली आहे. नाशिकमध्येच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील ध्वजारोहण करणार आहेत. तर भुजबळही नाशिकमध्ये दाखल झाले असून मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न होणार आहे.









