नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का ? ठाकरे गटाचा हा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक – सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आता नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह ८ माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. त्यामुळे हा विवाह सोहळा चर्चेत आला होता. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांची सत्ताधारी पक्षासोबत जवळीक वाढताना दिसून आली.

दोन्ही शिवसेना पक्षांत वितुष्ट जात नसताना दोन्हीकडूनही एकमेकांवर टीकेचे जोरदार प्रहार होत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावल्याने विलास शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा कार्यकर्ता, अशी शाबासकीची थाप एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांना दिली होती.

त्यानंतर, सुधाकर बडगुजर यांनी देखील विलास शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, विलास शिंदे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी विलास शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास शिंदे यांनी नुकतीच नाशिकमध्ये मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या समर्थकांसोबत चर्चा करताना त्यांनी पक्षात डावलले गेल्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महापौर पद तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मी सक्षम असूनही मला उमेदवारी मिळाली नाही, अशी मनातील खंतही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

error: Content is protected !!